त्या दिवशी तो सकाळी सकाळी दिसला,
अंगभर कोड घेउन किळसवाण्या अवस्थेत फिरताना,
शरीर जर्जर झाले होते पण डोळ्यात चमक होती
अंगभर वेदना होत्या पण चेहरा शांत होता
हातात वाटी घेउन तो तेल मागत होता
भाळी भळभळणाऱ्या जखमेचा दाह शमविण्यासाठी
सकाळी सकाळी अभद्र दर्शन म्हणून
लोकांच्या कपाळी आठी चढलेली दिसत होती
लोकांच्या कुत्सित नजरा त्याला परिचयाच्या होत्या
पण तरीही तो शांत होता
मला त्याची दया येत न्हवती
पण किळसही वाटत न्हवती
तो कोण असेल? असा का फिरत असेल?
का त्याला कोणी मदत करत नसेल?
माझ्या डोक्यात विचारचक्र चालू होते
आणि इतक्यात तो दिसेनासा झाला
माझी नजर त्याला शोधू लागली
“मला शोधतो आहेस?” शेजारून प्रश्न आला
माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न त्याला न विचारताच कळले असावेत
“मी अश्वत्थामा” त्याने ओळख करून दिली
माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात
मीही इतरांसारखा किळसवाण्या नजरेने त्याच्याकडे पहातो
तो हसतो… उपरोधीत…
आता त्याच्या शांत चेहऱ्यावर वेदना जाणवते
“अरे पित्याच्या कपटाने केलेल्या वधाचा प्रतिशोध
म्हणून मी भ्रूण हत्येचे पाप केले…
त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उपेक्षित भटकतो आहे
पण आज इथे राजरोस भ्रूण हत्या होत आहेत
आता कुठे गेला तुमचा कृष्ण?
की त्या उत्तरा त्याच्या कोणी लागत नाहीत?”
अश्वत्थामा निघून गेला…
भाळी नाही तर काळजात एक भळभळणारी जखम देउन…
Saturday, June 6, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment