Saturday, June 6, 2009

जाणीवांचे कावळे

८ डिसेंबर २००८…

जे मेले ते सगळे हिंदू होते म्हणून नाही
तर मी हिंदू आहे म्हणून
हिंदू परंपरेनुसार आज त्या सगळ्यांची
सामुहिक दशक्रिया विधी आहे

कसला पिंड अर्पण करावा
कुठले वचन द्यावे
कोणत्या गोष्टी त्यांच्यानावे त्यागाव्या
जेणे करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल

पिंडच जर अर्पण करायचा असेल तर
त्याच्या मरणाला जे जबाबदार आहेत
त्यांच्या रक्ता-मांसाचा
पिंड मी अर्पण करू शकेन काय?

त्यांच्या अंतिम इच्छा काय होत्या माहीत नाही
पण त्यांच्या मागे जे आहेत
त्यांच्या सुरक्षिततेचे वचन
मी देऊ शकेन काय?

ज्या भ्रष्ट व्यवस्थेचा मी एक अविभाज्य भाग आहे
अशा भ्रष्ट व्यवस्थेत जगताना
जे मेले त्यांच्या नावे मी स्वतःपुरता तरी
भ्रष्टाचार सोडू शकेन काय?

माझी अगतिकता समजून
निष्पाप जीवांच्या पिंडाना
भुकेलेले कावळे शिवले
तरी माझ्या जाणीवांचे कावळे
मला बोचत राहतील

No comments:

Post a Comment