काल परवाची गोष्ट आहे … आम्ही म्हणजे मी आणि सौ ऋतुगंधच्या मिटींग मधे आपल्याला जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल याचा उहापोह करून बाहेर पडलो. बसस्टॉपवर येवून लिटिल इंडीयाला जाणारी बस कोणती हे पहात असतानाच काही मराठी आवाज कानावर पडले. मागे वळून पाहिले तर दोन अनोळखी चेहरे सिंगापूरी लोकांबद्दल आपापली मते व्यक्त करण्यात मश्गुल होते. “कदाचित प्रोजेक्टवर आले असतील…” माझी आणि सौ ची सांकेतिक नजरानजर …
आम्ही आम्हाला हवी ती माहिती पाहून समभाषिक मराठी बंधूंपासून काही अंतरावर उभे राहिलो. अंमळ त्याना टाळूनच … काही वेळाने आमची बस आली आणि आम्ही बसमधे चढलो. बस मधे बसल्याबसल्या डोक्यातील चक्रे फिरू लागली … आपल्यातलाच विरोधाभास जाणवू लागला … काही वेळापूर्वी मिटिंगमधे ऋतुगंधच्या माध्यमातून ऑन-लाइन जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचू पाहणारे आपण आणि आता बसस्टॉपवर दोन मराठी माणसांना टाळून उभे राहणारे आपण … आणि मग एक विचारमालिका सुरू झाली … काहीश्या वेगळ्या विचारांची … आपण असे का वागतो?
आपणही ऑन-लाइन जगात कंफर्टेबल असणा-यांच्या जगात सामील व्हायला लागलोय की काय अशी बोचरी शंका येऊ लागली. ऑन-लाइन जगात आपला मूड, आपली प्रायवसी प्रोटेक्टेड असते. मूड असेल तर बोलायचे … नसेल तर साइन आऊट … ऑन लाइन असून लोकांशी बोलायचे नसेल तर “इन-विजिबल” राहता येते. एखादी व्यक्ती डोक्याला ताप देत असेल तर तिला “ब्लॉक” करता येते … म्हणजे थोडक्यात ऑन-लाइन जगात आपण आपल्या मर्जीचे मालक असतो.
ह्या मर्जीच्या मालकीने समाधान न झाल्यास “सेकंड लाइफ” वर जाउन हवा तो “अवतार” घेता येतो… (“अवतार” घेणे हे इतके सहजशक्य असते हे भगवान विष्णूंना कळले तर त्यांना काय वाटेल?) आपल्या सारख्या इतर अवतारी लोकांना भेटता येतं … खिशात लिंडन डॉलर्स (सेकंड लाइफच्या जगातील चलन!) खेळत असतील तर जमीन-जुमला, गाडी असे सगळे काही खरेदी करता येते … आणि हे सगळं होत असताना चिरतरूण रहाता येते … आहे की नाही मज्जा!!
आता मला सांगा हे ऑन-लाइन जग इतके सुंदर असेल तर आपल्याला खर्याखुर्या जगाची गरजंच काय? उगाच घराबाहेर पडायचे, चार लोकांना भेटायचे, त्यांच्या ओळखी, त्यातून अपेक्षा, इमोशनल क्रायसिस … छे छे ह्या सगळ्या पेक्षा ते ऑन-लाइन जगंच बरे … हो की नाही? पण मित्रांनो ह्या जस्टिफिकेशन मधेच ह्या प्रश्नाचे उत्तर दडले आहे.
जेव्हा इंटरनेट नव्हते तेव्हा लोक एकमेकांना भेटत होते. त्यातून उद्भवणारे इमोशनल क्रायसिस तेंव्हाही असायचे … पण त्यावेळी लोक त्या इमोशनल क्रायसिसना सामोरे जाऊ शकत होते. आजकाल आपल्याला “एस्केप रूट” आहे म्हणून आपण त्या क्रायसिसना सामोरे न जाता “पतली गली” ने पलायन करतो. आणि हेच पलायन आपले भावनिक खच्चीकरण करत असते. जेव्हां आयुष्यात खरोखर इमोशनल क्रायसिस उद्भवतात तेंव्हा आपल्याला ते हॅंडल कसे करायचे ते माहितच नसते किंबहुना सवय उरलेली नसते. आणि ही जर अवस्था आपली असेल तर उद्याच्या इंटरनेट जनरेशनचे काय सांगावे!!
अगदी साध्यासोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या मेंदूला आपण जसे लावावे तसे वळण लागते. जर आपण भावनिकदृष्ट्या मेंदूला अलिप्त ठेवून फक्त काल्पनिक जगात रममाण व्हायला शिकविले तर ख-या जगातील संवाद, त्यातून उद्भवणारे ताण मेंदूला सहनच होणार नाहीत. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका संशोधनात असे आढळून आले की इंटरनेट, टेलिविजन इत्यादी गोष्टींच्या अतिवापरामुळे शालेय विद्यार्थ्यांमधे हिंसक वृत्ती वाढीला लागली आहे. कारण आई वडील नोकरी करत असल्यामुळे ही मुले शक्यतो एकटी राहतात. अशा मुलांना समूहात / समाजात कसे वावरावे हे कळत नसते.
थोडक्यात काय तर अगदी दोन पावलावर राहणार्या मित्राला आपण ऑरकुटवर का भेटतो? येतांजातां कानात बटणं घालून आजूबाजूला चालू असलेल्या जीवनसंगीताकडे दुर्लक्ष का करतो? महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला न येता एकमेकांना मेलवर / एसएमएस वर पाडव्याच्या शुभेच्छा का देतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण स्वतःला देण्याची आज गरज आहे.
Saturday, June 6, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment