नाळ जोडली जाणे… अजून पर्यंत हा फक्त एक वाक्प्रचार म्हणून माहीत होता… पण त्याच्या मागे किती गहन अर्थ आहे ते आता समजले. कदाचित “समजले” ही अतिशयोक्ती होईल… समजू लागला आहे असे म्हणता येईल फार तर…
बाळ जन्माला येणे ही प्रक्रियाच वेड लावणारी आहे. एक पेशी… त्याचे विभाजन होऊन दोन पेशी… असे करता करता पेशींचा समुह.. त्या समुहातून मेंदू आणि हृदय तयार होणे... कन्सेप्शन पासून तिसऱ्या आठवड्यात हृदयाची धडधड सोनोग्राफीच्या पटलावर अनुभवणे हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय क्षण होता. नकळत माझा हात माझ्या छातीवर गेला. माझाच अंश… माझ्याच हृदयाची धडधड मला समोर पटलावर दिसत होती… जाणवत होती… सगळ्या संवेदना बधीर झाल्या होत्या… माझ्या हृदयातील धडधड आणि पटलावरील बाळाच्या हृदयाची धडधड याच्या पलिकडे काहीच जाणवत न्हवते… सुप्रदाच्या हातावरच्या घट्ट झालेल्या पकडीने मी भानावर आलो.
या आधी ही सगळी प्रक्रिया माहीत होती… पण ती माहीत असणे आणि ती अनुभवणे, ती अनुभूती जगणे… यात जमिन-अस्मानचा फरक होता. ही अनुभूतीच हृदयी मातृत्व जागे करीत असावी… स्त्री-पुरूष असा लिंगभेद न करता!! ह्याच अनुभूतीने मी “आई” वा “मातृत्व” ह्या संकल्पेनेचा विचार करू लागलो.
आणि यातूनच नाळ जोडली जाणे याचा अर्थ समजू लागला…
गर्भात असताना आई आणि बाळ यांना जोडणारा दुवा… याच नाळेतून आईच्या शरिरातील पोषक तत्वे बाळा पर्यंत पोह्चविली जातात… प्रसंगी तिच्या हाडांतून कॅल्शियम घेउन बाळाचे पोषण केले जाते… थोडक्यात काय तर आईच्या रक्तावर एक पिंड पोसला जातो… नऊ महीने नऊ दिवस… हा पिंड पोसण्याचे काम ह्या नाळेवर अवलंबून असते.
हा अर्थ उमजत असतानाच जाणिव झाली की माझा पिंडही एका आईच्या रक्तावर पोसला गेला आहे. मी तिच्याच शरिराचा एक भाग होतो. गर्भधारणे पासून अगदी वर्षा-दीड-वर्षाचा होई पर्यंत हा पिंड तिच्याच शरिरातील सत्व घेउन स्वतःचे पोषण करीत होता. ही जाणीव मला माझ्या देहाची, माझ्या पिंडाची नव्याने ओळख करून देत होता.
आणि मनात कुठेतरी…
“बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात
बीजा हवी निगराणी, हवी मायेची सावली
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात”
ह्या गाण्याच्या ओळींचा अर्थ उलगडत होता. बीज, ओली माती, निगराणी, मायेची सावली, लख्ख निर्मळ प्रकाश, कष्टाचा पाझर, अंधारल्या रातीची चंद्रकिरणं ह्या सगळ्या गोष्टींचे संर्दभ जुळुन येत होते.
“आई” ने आजारपणात जागविलेल्या रात्री, परिक्षेच्या वेळी थर्मासमधे भरून ठेवलेला चहा, न सांगता खर्च केलेल्या चार आण्यांसाठी केलेली शिक्षा, खोटेपणा बद्दल धरलेला अबोला, वाढदिवसाला केलेले औक्षण, परिस्थिती नसताना भरलेले पिकनिकचे पैसे... असे अनेक संर्दभ चलचित्रपटासारखे भरभर डोळ्यासमोरून जाऊ लागतात… नुसता पिंडच नाही तर हे व्यक्तित्व देखील तिने पोसले आहे याची जाणीव होते…
आता “आई” ही संकल्पना अवघे अस्तित्व व्यापून टाकते…
अशा या “आई” / “मातृत्वाच्या” संकल्पनेशी आपण ज्या माध्यमाने जोडलेले असतो ते माध्यम म्हणजे “नाळ”… आणि म्हणूनच जो पर्यंत नाळ जोडलेली आहे तो पर्यंत आई हा आपल्या अस्तित्वाचाच एक भाग असते.
Saturday, June 6, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment