Saturday, June 6, 2009

बोलावणे आल्या शिवाय नाही!!

सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना बरेच चांगले वाईट अनुभव येतात. मलाही आले… कधी आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद खूप उत्साहित करायचा तर कधी कधी लोकांचा अनुत्साह बघून खूप वाईट वाटायचे… पण नंतर या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडल्या. कधी कधी तर “स्थितप्रज्ञ” अवस्थेला पोहचल्याचा भास व्हायचा. म्हणजे कार्यक्रमाला लोक आले तरी आनंद नाही… नाही आले तरी खेद नाही… पण ही “स्थितप्रज्ञ अवस्था” तात्पुरती असायची. परत पुढचा कार्यक्रम आला की पुन्हा सर्क्युलर पाठवा, सभासदांच्या प्रतिसादाची वाट पाहा… आला तर उत्तमच.. नाही आला तर फोन उचलायचा… अड्रेस बुक मधून नंबर शोधायचे आणि ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांना फोन करायचे… जोडीला सौ ना त्यांचा फोन चेक करायला सांगायचा… मग तिनेही फोन करायचे… आणि बरेचदा असे व्हायचे की फोन केल्या नंतर बरेच लोक होकार द्यायचे… असे होकार मिळाल्यानंतर आम्ही एकमेकांकडे बघून म्हणायचो… “…ह्म्म बोलावणे आल्या शिवाय नाही!!”

मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना हा अनुभव आला असेलच आणि हे असे अनुभव आल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की लोक असे का वागतात? म्हणजे असे पाहा की घरी काही तरी समारंभ असतो… घाईघाईने सगळ्यांना पत्रिका पाठविल्या जातात… आणि त्यात कुठल्यातरी मावशीच्या सासूबाईंना फोन करून ’अगत्याचे बोलावणे’ राहून जाते। समारंभ संपल्यावर आई मावशीला सासूबाईंच्या न येण्याबद्दल विचारते… मावशी उत्तरते, “अग तू नुसती पत्रिका पाठवलीस॥ फोन करून या असं कुठे म्हणालीस…” हे ऐकल्यावर माझ्या मनात येते… अहो मग पत्रिका काय द्रोण करून चणे-कुरमुरे खायला पाठविली होती?

तर अशी “मान्यवर संस्थानिक” मंडळी आपल्याला सर्वत्र आढळतात. मुलांच्या स्पर्धा आयोजित कराव्या… सर्क्युलर पाठवावे… “जेंटल रिमाइंडर्स” पाठवावे… आणि तरीही स्पर्धेच्या दोन दिवसाआधी पर्यंत एकही एंट्री येऊ नये… मग कार्यकर्त्यांनी घरचे कार्य असल्याप्रमाणे फोन करून पर्सनल आमंत्रण करावी… आणि मग असे आमंत्रण आले की स्वतःच्या आणि मैत्रिणीच्या मुलांनाही घेऊन हजर व्हावे.

असे प्रसंग झाले की सुरवातीला खूप राग यायचा… पण नंतर लोकांशी बोलल्यावर असे लक्षात आले की दरवेळी ही मंडळी काही फोनची किंवा आमंत्रणाची वाट पाहत असतात असे नाही। त्यांच्या न येण्याची अनेक कारणे असू शकतात…

काही जाणती मंडळी नवीन सभासदांना वाव मिळावा म्हणून मागे राहतात। त्यांचा हा उदात्त हेतू त्यांच्याशी बोलल्याशिवाय लक्षात येत नाही।

एखादा आठवडा महिन्याभराचे काम घेऊन येतो आणि आपण आतुरतेने विकेंडची वाट पाहत असतो. अशा विकेंडला आंबलेलं अंग आणि मन रिलॅक्स करावं असं वाटण साहजिक आहे. अशा दिवशी कुठलेही आमंत्रण नकोसे वाटते… आणि “तू नाही तर मी पण नाही” असं म्हणत जोडीदारानेही ते टाळावे असे प्रसंगही काही नवीन नाहीत. अशा वेळी येणारं आग्रहाचं बोलावणं मनाला तरतरी देऊन जातं.

कधी कधी एकाच दिवशी दोन कार्यक्रमांची निमंत्रण येतात आणि “… इक तरफ उसका घर, इक तरफ मैकदा” अशी अवस्था होते… अशात एखादा फोन कॉल आपला निर्णय घेण्याचे काम सोपे करून जातो। (दुसराही आला तर पंचाईत होते!)

काही जणांची आधीच्या एखाद्या वाईट अनुभवानंतर मने दुखावलेली असतात (ज्याच्याशी आता काम करणाऱ्य़ांशी काहीही संबंध नसतो). अशावेळी एखादा फोन ही मने सांधण्याचे काम करतो.

तर थोडक्यात काय मंडळी… आपण हवे आहोत… आपल्याला कोणीतरी बोलावते आहे, आपल्या येण्या वा न येण्याची दखल घेतली जात आहे ही भावनाच मनाला सुखावून जाणारी असते।

आणि मंडळी आपणही अशा सहज मानवी भावनांना अपवाद नसतो। अनेकदा कळत-नकळत आपणही “मान्यवर संस्थानिकांसारखे” वागलेले असतो. आठवून पाहा… असे कितीतरी प्रसंग आठवतील जेव्हा एखाद्या आलेल्या आमंत्रणाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि फोन यायची वाट पाहतो. ऑफिसमध्ये आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमचे सोल्युशन माहीत असते पण कोणीतरी आपल्याला विचारल्या शिवाय आपण सांगत नाही. गाणं म्हणता येत असतं पण कोणी आपल्याला आवर्जून आग्रह केल्याखेरिज आपण म्हणत नाही. थोडक्यात काय की बरेचदा आपल्याला भाव मिळाल्याशिवाय आपली कळी खुलत नाही… आपणही थोडेसे का होईना पण संस्थानिक असतो.

मंडळी हे सगळे वैयक्तिक आयुष्यात ठीक असते… पण सार्वजनिक आयुष्यात आपण थोडेसे अधिक “सुजाण” असायला नको का? कारण सार्वजनिक आयुष्यात कार्यक्रम आयोजित करणारी मंडळी किंवा एखादा उपक्रम चालविणारी मंडळी ही तुम्हा-आम्हा सारखी नोकरीधंदा सांभाळून हे उपद्व्याप करीत असतात. त्यांनाही बरीच कामं असतात… अशावेळी त्यांच्या हाकेला लगेच ओ मिळाली तर त्यांचाही हुरूप कित्येक पटीने वाढेल… कार्यक्रमांचे आयोजन कितीतरी चांगल्या रीतीने करता येईल… आणि ह्या सगळ्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे…. नाही का?

तर काय मग पुढच्या वेळी बोलावण्याची वाट पाहणार की…

No comments:

Post a Comment